आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केंद्राने करावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
65
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहीजे, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त १४ लाख कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहे. जे फक्त तीन दिवस पुरतील. त्यानंतर राज्यातील लसीकरण बंद होऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील नऊ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरंस घेतली. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

राजेश टोपे म्हणाले, ”या व्हिडिओ कॉन्फरंसमध्ये  प्रकाश जावडेकर साहेबांनी अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आम्हाला सांगितली आहे. दररोज ३ लाख लसीकरण महाराष्ट्रात केले जात आहे. त्याऐवजी एका दिवसात ६ लाख लसीकरण करा. तेवढे लसीकरणाचे डोस केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे आव्हान आम्ही स्विकारले आहे. दररोज महाराष्ट्रात साडेचार लाख लसीकरणाचे डोस दिले जात आहेत. लवकरच ही संख्या पाच लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करु. लसीकरण मोफत आहे, सुरक्षित आहे आणि घराजवळच याचे केंद्र आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. २० ते ४० या वयोगटातील नागरिकांना लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात रोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यातील ८० टक्के ऑक्सिजन हा रुग्णालयांसाठी उपलब्ध आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची सध्या जास्त गरज भासत आहे. यासाठी आजूबाजूच्या जवळील राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा देण्यात यावा,अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तसेच दररोज पन्नास हजार रेमडेसिवीरची इन्जेक्शन मिळतात, त्या पन्नास हजार इन्जेक्शन्सचा वापर होत आहे. तसेच रेमडेसिवीर ११०० ते १४०० रुपयांपर्यंतच विकावे,असे सांगण्यात आले असताना त्याचे पालन होत नाहि. रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असे यावेळी टोपेंनी सर्व रुग्णालयातील डॉक्टर्संना केले.

राज्यात बेड्सची कमतरता दिसून येते. याबाबत ते म्हणाले की, ”मुंबईत व पुण्यात रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध होत नाहिये. यासाठी मुंबईत आणखी २००० बेड्स उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यामध्ये काही प्रमाणात बेड्स वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला असून काही खाजगी रुग्णालयांत आयसीयू व ऑक्सिजनचे मिळून ५०० बेड्स वाढवण्यात येणार आहेत. इतर राज्यातही गरजेप्रमाणे बेड्स वाढवण्याचे काम सुरु आहे.