शबनम न्युज / पुणे
राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोव्हीड-19 रोग प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानाअंतर्गत दि. 4 एप्रिल 2021 रोजी आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशांमधील बाबींचे स्पष्टीकरण-1 आणि स्पष्टीकरण-2 निर्गमीत करण्यात आले आहेत. यामध्ये पशुसंवर्धन विभागाशी निगडीत विविध बाबी अंतर्भूत आहेत. या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितांनी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे “ कोव्हीड-19 प्रसार खंडीत करणे अभियान” अंतर्गत निर्गमीत केलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
शासन आदेश नुसार अत्यावश्यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबडया, मटन, अंडी, मासे दुकानांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु / कुक्कुट खाद्य, चारा इ. चा समावेश आहे.
स्थानिक कार्यालयाच्या मान्सून पूर्व उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नमूद काळात हाती घ्यावयाच्या लसीकरण कार्यक्रमांचा अंतर्भाव होतो. स्थानिक कार्यालयाच्या मार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणा-या सेवा समाविष्ट आहेत. यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचा समावेश होतो.
अत्यावश्यक सेवांमध्ये माल वाहतूक समाविष्ट आहे. तसेच सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा श्रुंखला (Supply Chain) अबाधित ठेवण्यात आली आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तू व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणूकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव होतो.
अत्यावश्यक सेवांमध्ये सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अन्न प्रक्रीया उद्योग, डेयरी युनिट्स, पशुखाद्य व चारा प्रक्रिया युनिट्स, औषध निर्मिती कारखाने, लस निर्मिती संस्था, वैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट्स तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतुक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट आहेत.
या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितांनी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे “कोव्हीड-19 प्रसार खंडीत करणे अभियान” अंतर्गत निर्गमीत केलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.