राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
शबनम न्यूज / मुंबई
माजलगाव मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी संबंधित सिंचन समस्या आणि प्रश्नांबाबत आज मंत्रालयातील दालनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजलगावचे आ. प्रकाशदादा सोळंके आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जायकवाडी प्रकल्पातील उजव्या कालव्याची दुरुस्ती, गाळ काढणे व इतर कामांबाबत जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. तसेच कालव्याच्या सद्यस्थितीची हि जयंत पाटील यांनी माहिती घेतली. कालव्याच्या दुरुस्ती आणि इतर कामांबाबत सर्वेक्षण करून त्वरित प्रस्ताव सादर करावा, अशा सुचना जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था तसेच माजलगाव प्रकल्पाची पुर्नस्थापना व दुरुस्ती यावर चर्चा करण्यात आली. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या प्रकल्पावर काम कसे करता येईल याबाबत विचार करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
माजलगावातील मंजरथ येथे सिंदफाना नदीवर पूल बांधण्याची मागणी आ. प्रकाश सोळंके यांनी केली आहे. त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या. तसेच आरणवाडी, रेपेवाडी प्रकल्पाच्या अडचणींवरही चर्चा झाली. हे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाईल.असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.