पिंपरी दि. १२ एप्रिल – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम, जंम्बो हॉस्पीटल, ऑटो क्लस्टर, थेरगाव, जिजामाता, आकुर्डी, भोसरी या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याच्या सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. आज आयुक्त् कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक व वैद्यकीय अधिका-यांच्या बैठकीत कोरोना उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक बापू काटे, शशिकांत कदम, डॉ. वैशाली घोडेकर, मोरेश्वर भोंडवे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. पवन साळवी, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. वर्षा डांगे उपस्थित होते. बैठकीत पदाधिका-यांनी आपआपल्या सुचना मांडल्या तसेच प्रशासनाच्या वतीने या महामारीला आळा घालण्यासाठी काय नियोजन आखले याची विचारपुस केली. यावर आयुक्त यांनी माहिती दिली.
ते म्हणाले जंम्बो हॉस्पीटल येथे नव्याने ५९ व्हेंटिलेटर बसविण्यात येत आहेत. येत्या दोन दिवसात हे काम पुर्ण होणार आहे तसेच थेरगाव, जिजामाता, आकुर्डी, भोसरी हॉस्पीटल या ठिकाणी प्रत्येकी आवश्यक्तेनुसार १० ते १२ व्हेंटिलेटर बसविण्याचे नियोजन आहे. तसेच या चारही हॉस्पीटल मिळून ऑक्सिजनचे ४०० बेड तातडीने तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सी.सी.सी.सेंटर मध्ये ५ ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वायसीएम रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होऊ नये म्हणून समन्वयकांची नेमणूक करण्यात येईल. तसेच उपलब्ध बेडची माहिती डॅशबोर्ड द्वारे देऊन रुग्णांना त्वरीत बेड उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात येईल. रुग्णांसाठीच्या बेडची चौकशी थेट डॉक्टरांशी न करता महापालिका प्रशासनाने नेमणूक केलेल्या समन्वयक अधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवडयाबाबत ते म्हणाले, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांसाठी पुरेसा रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. रुग्णांच्या आवश्यक्तेनुसार रेमडिसिव्हीर इंजेक्शन देण्याच्या सुचना संबंधित डॉक्टरांना करण्यात आलेल्या आहेत. विभागीय आयुक्तांशी चर्चा करुन खाजगी रुग्णालयांना सुध्दा रेमडिसिव्हीर इंजेक्शनची आवश्यक्तेनुसारच रुग्णांना देण्याची सुचना करण्यात आली आहेत त्यानुसार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.