शबनम न्युज / पुणे
पुणे शहरातील 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरसकट कोरोनाची लस देण्याची मोहीम राबवून त्वरित लस उपलब्ध करून व्हावी, असे मागणीचे निवेदन आमदार चेतन तुपे (पाटील) यांनी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, संपूर्ण देशात कोरोनाचे संकट वाढत असून कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून संक्रमणाचा वेगही अधिक आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2019 रोजी 60 वर्षावरील व्यक्तींना कोरोना ची लस देण्यास सुरुवात केली होती. आता 45 वर्षावरील व्यक्तींना सुद्धा कोरोना ची लस देण्यास सुरुवात केली आहे.
फेब्रुवारीपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. तेव्हापासून 18 ते 45 वयोगटातील तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे, ही काळाची गरज आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुणांमुळे घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता 18 वर्षावरील तरुणांना लस देणे गरजेचे आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही, हे दुर्देवी आहे. ज्या झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले गेले पाहिजे.
तरुणांमध्ये कोरोनाचे संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने पुणे शहरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना सरसकट कोरोनाची लस देण्याची मोहीम राबवून त्वरित लस उपलब्ध करून व्हावी, असेही आमदार चेतन विठ्ठल तुपे (पाटील) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.