लॉकडाऊन विरोध : व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड भाजपाचा पाठिंबा

0
351
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
  • पिंपरी मर्चंट फेडरेशनचे कॅम्प बाजारपेठ येथे आंदोलन
  • फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांची माहिती

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाची परिस्थिती प्रशासनच्या नियंत्रणाबाहेर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्व बाजारपेठा जीवनावश्यक गरजांची दुकाने वगळता बंद केली आहेत. परिणामी, अन्य व्यवसायिकांनी लॉकडाऊन विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवार दि. 7 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. याला पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या लॉकडाऊन विरोधात आज बुधवारी दुपारी 1.00 वाजता पिंपरी कॅम्प मेन बाजार येथे सर्व व्यापारी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील विविध 17 व्यापारी संघटनाचे फेडरेशन करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे प्रतिनिधी म्हणून माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, लॉकडाऊन-१ मध्ये व्यापारी, दुकानदार, स्टॉलधारक आणि छोटे व्यावसायिक यांची विस्कटलेली घडी आता कुठे सुरळीत बसताना दिसत आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन- २ मुळे व्यवसायिकांचे अर्थचक्र कोलमडणार आहे. प्रशासन आणि सरकारने व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांचाही विचार केला पाहिजे. कोरोना रोखण्यासाठी नियमावली कडक करणे अपेक्षीत आहे. केवळ लॉकडाऊन हा उपाय ठरणार नाही.