पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) -* महिनाभरा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना अपु-या रक्तसाठ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुक्रवारी (दि. 9 एप्रिल 2021) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.
पिंपरी वाघेरे येथील काशिबा शिंदे सभागृहात शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड दररोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी, शहरातील परस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. राज्यभरात रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केलेले आहे. त्या नुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबीरे घेऊन रक्तसंचय वाढविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये हे रक्तदान शिबीर होत आहे. शहरातील जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी रक्तदान करून कोरोना विरुध्दच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.