शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आदेश
पिंपरी, 24 फेब्रुवारी – शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग केल्याने आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याने राहुल कलाटे यांना शिवसेना गटनेते पदाचा तत्काळ राजीनामा देण्याचा आदेश शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.तसेच शिवसेना सचीव अनिल देसाई यांनी खुलासा मागवला असुन पक्ष आदेश पाठवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नुकतीच आठ सदस्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी पक्षाचा आदेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिले. कलाटे यांनी पक्ष आदेशाचा भंग केला.
गटनेतेपदी कामकाज करत असताना स्वतःच्या मर्जीतील लोकांना पदे वाटप केली आहेत. आपण शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. पक्षाचे आदेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवत आहात. त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा त्वरित महापौर, विभागीय आयुक्तांकडे राजीनामा द्यावा. हा पक्षादेश आहे, असा आदेश शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी कलाटे यांना दिला असुन पक्षाचा आदेश शिवसेना सचिव अनिस देसाई यांनी बजावला आहे.
”आपण पक्ष आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे गटनेतेपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा. पक्षाचा तसा आदेश आहे”, अशी सूचना माजी आमदार, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी कलाटे यांना दुरध्वनीवरुन केली आहे.