शबनम न्यूज / मुंबई
राजकीय, सामाजिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचा निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांचे निधन ही देशातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीची मोठी हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.
निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाने देशाच्या राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे ज्येष्ठ विधीज्ञ, कृतीशील विचारवंत, सामाजिक सुधारणांना वाहून घेतलेले पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे असे अजित पवार म्हणाले.
न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे देशाच्या न्यायदान प्रक्रियेतले व सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांचे निवाडे कायद्याच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निवाड्यांकडे न्यायदानाच्या व्यवस्थेतील मैलाचे दगड म्हणून बघितले जाते. निवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वाहून घेतलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. देशातील व्यक्ती, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्याचे काम त्यांनी केले. दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांचा आवाज म्हणून ते कार्यरत राहिले असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.