पिंपरी चिंचवड / शबनम न्यूज
पिंपरी :- महाराष्ट्र राज्य पर्यावरण महामंडळाने कारवाई केल्यास थेरगाव येथील पद्मजी पेपर मिल बंद होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन व आर्थिक मंदीमध्ये तेथील १२०० कामगार बेकार होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. हे कृत्य शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी करू नये, असा सल्ला माजी नगरसेवक संतोष बारणे आणि युवा नेते श्री. गणेश गुजर यांनी गुरूवारी (दि.२९) पत्रकार परिषदेत दिला. तसेच, जानेवारी महिन्यात होणारी नोकरी भरती डोळ्यासमोर ठेऊन खासदार यांनी तक्रार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पद्मजी मिलमुळे प्रदूषण होत असून कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे नुकतीच केली आहे. या बाबत माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे व युवा नेते श्री.गणेश गुजर म्हणाले की, खासदार बारणे यांच्या घराच्या भिंतीला लागून पदमजी पेपर मिल आहे. त्यांनी थेट कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असती तर, त्यांनी तत्काळ उपाययोजना करून प्रदूषण रोखले असते. मात्र, तसे न करता त्यांनी थेट पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार करणे हे त्यांना शोभत नाही.
कंपनीत १२०० कामगार असून, त्यातील ६० टक्के कामगार हे थेरगाव परिसरातील आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडून कामगारांच्या नोकर्या जात आहेत. पर्यावरण विभागाने कारवाई केल्यास ही ३५ वर्षे जुनी कंपनी बंद होऊ शकते. तेथील सर्व कामगार बेरोजगार होण्याचा धोका आहे. परिणामी, त्यांच्या कुटुंबाची उपासमार होणार आहे, असे ते म्हणाले.
खासदारांनी कामगारांच्या हितासाठी घराशेजारच्या कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असती, तर हा प्रश्न सहज निकाली निघाला असता, असा विश्वास ही श्री. संतोष बारणे यांनी व्यक्त केला.
युवा नेते श्री. गणेश गुजर यांनी या प्रसंगी सांगितले की, जशी पर्यावरणाची समस्या गुंतागुंतीची आहे त्याचप्रमाणे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न देखील गंभीर आहे.आजच्या काळात दुर्दैवाने कंपनी बंद झाली तर अनेक कामगारांचे आयुष्य उद्धवस्त होईल , मात्र त्याचबरोबर पदमजी पेपर मिल या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या आरोग्य विघातक अशा धुलिकणांचा देखील बंदोबस्त व्हायला हवा कारण या धुलिकणांमुळे देखील स्थानिक रहिवाशी त्रस्त आहेत.तरीदेखील आपल्या परिसरातील या मोठ्या कंपनीचे कोणतेही नुकसान न होता उलट प्रगती व्हावी अशीच परिसरातील सर्व नागरीकांची भावना आहे. त्यामुळे अशा प्रसंगी नागरिकांचे आरोग्य आणि कामगारांचा रोजगार या दोन्ही बाबींचा सकारात्मक विचार करून कंपनी व्यवस्थापनाने योग्य त्या तांत्रिक उपाययोजना कराव्यात , या मागणीसाठी श्री. गणेश गुजर पदमजी पेपर मिल मधील कामगार संघटनेच्या बरोबरीने कंपनी व्यवस्थापनाची भेट घेणार आहेत.