शबनम न्युज : ३० जून (नवी दिल्ली ) – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात उदभवलेली गंभीर परिस्थिती आणि लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावाबाबत मोदी बोलतील, असा देशवासियांना अंदाज होता. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा मोदींनी केली. त्यानुसार, देशातील 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणइ एक किलो चना डाळ आणखी 5 महिने मोफत मिळणार आहे.
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचं असल्याचं मोदींनी आजच्या भाषणात म्हटलं.
केंद्र सरकारकडून लॉकडाऊन काळात 30 कोटी जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचीही सुरुवात करण्यात आली आहे. देशातील 80 टक्के नागरिकांना मोफत धान्य देण्याचं कामही सरकारने केलं आहे. आता, प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना आणखी 5 महिने वाढविण्यात आली असून 80 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना धान्य मोफत देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चना डाळही मोफत मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांचा आणि आगामी 5 महिन्यांच्या मोफत धान्याचा खर्च एकूण 1.50 हजार कोटी रुपये एवढा असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, अद्यापही काळजी घेण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहांनी मोदींच्या भाषणापूर्वी, महत्त्वपूर्ण, आज संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना उद्देशून होणारे संबोधन जरूर ऐका, असे आवाहन केले होते. त्यामुळे देशावासियांना मोदींच्या भाषणाची आतुरता होती. ट्विटच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी IMPORTANT शब्दाचा उल्लेख केला होता. त्यामुळे, आजच्या भाषणाबद्दल कमालीची उत्सुकताही होती. त्यानुसार, मोदींनी 4 वाजता देशवासियांशी संवाद साधला.