पुणे / शबनम न्युज
जिल्हा वार्षिक योजनेमधून चालू आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी 80 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
या निधीमधून सलग समतल चर, शेतबांध बंधिस्ती, मजगी इत्यादी क्षेत्र उपचार तसेच डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, शेततळे इत्यादी ओघळीवरील योजना राबविण्यात येणार आहेत. अनुसूचित जातीच्या शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संमती घेऊन त्यांची वैयक्तिक क्षेत्रावर वरीलप्रमाणे उपचार घेण्यात येतात.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला, 7/12 उतारा व 8 अ चा उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या शेतक-यांनी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक तसेच उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पुणे यांनी केले आहे.