उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते “पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार” अभियानाचा शुभारंभ

0
8
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची

पुणे / शबनम न्यूज

कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी “पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार” अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. “पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार” अभियानाला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना (कोविड-१९) विरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेंतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्य गट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार” या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप उपस्थित होते.

 

 

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ द्यावी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातांची नियमित स्वच्छता आदी दक्षता नियमांचे पालन करत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करून अर्थव्यवस्था पुढे घेवून जावी लागणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

 

 

 

पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे, ही समाधानकारक बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. आपण यापूर्वीही घरी राहून, दक्षता घेत सण उत्सव साजरे केले आहेत. यापुढेही नियमांचे पालन करून सण उत्सव घरीच साजरे करूया, तसेच कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा निर्धार करुया, असे सांगून राज्य शासन सर्वतोपरी पुणेकरांसोबत आहे, कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी सर्व यंत्रणा उपाययोजना करत आहेत, पुणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापुढेही काळजी घेत कोरोनाला हरवूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत “पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार” अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगतानाचा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे यापुढील कालावधीतही प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी “पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार” अभियानांतर्गत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत बसचे चालक, वाहक यांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिक,पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते. आभार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप यांनी मानले.