#PIMPRI : तिळगुळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा ; मकरसंक्रातीनिमित्त महिलांनी केली जागृती

0
51

शबनम न्युज / पिंपरी

“तिळगुळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा” असा संदेश आणि तिळगूळ वाहनचालकांना देऊन भगिनींनी गुरुवारी मकरसंक्रातीचा सण साजरा केला.

स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानतर्फे शहरातील मुख्य चोकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाचे यंदाचे १३ वे वर्ष होते.
प्रतिष्ठानच्या सदस्या आणि वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना तिळगूळासोबत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देऊन मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांना प्रतिकात्मक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. सीटबेल्ट लावलेल्या वाहनचालकांचे अभिनंदन करण्यात आले.
तीळगुळानी सजवलेले हेल्मेट दुचाकीस्वारांच्या डोक्यावर ठेवून ‘हेल्मेट वापरा, सुरक्षित राहा’ अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.

 

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे
यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला व वाहनचालकांना मार्गदर्शन केले.
वाहनचालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा निश्चय केला.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
अंजली ब्रह्मे, सुरेखा वाडेकर, नीरजा देशपांडे, जयश्री विरकर, पूनम राऊत, उदय वाडेकर यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

 

 पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांना तीळगुळ देऊन मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली व प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

वाहन चालकांच्या प्रतिक्रिया

प्रशांत राठोड: मी हेल्मेट घालण्याचा कंटाळा करतो. पण आज मकरसंक्रांतीनिमित्त हेल्मेट घालण्याचा संदेश दिला आहे. यापुढे मी नियमितपणे हेल्मेट घालणार .

दीपक मोहिते : आज महिलांनी वाहतूकीचे नियम पालनाबाबत जागृती केली. हा उपक्रम महत्वाचा आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांचे अभिनंदन.

नीरज चोधरी : मी हेल्मेट घालूनच दुचाकीवर प्रवास करतो. हेल्मेट घातल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला. याचा आनंद आहेच पण मकरसंक्रातीच्या वेगळ्या शुभेच्छाही मिळाल्या.