Thu. Aug 6th, 2020

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख

कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार समारंभ

शबनम न्यूज : सातारा (दि.१४ जानेवारी २०२०) :- पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया यांच्यामध्ये आमुलाग्र बदल होत असून ते प्रत्येक पत्रकारांने आत्मसात करून आपले अस्तित्व जपण्याची गरज असल्याचा सल्ला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिला.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याच्या लढाईला यश मिळाल्याबद्दल कराडच्या पत्रकारांच्यावतीने श्री. देशमुख यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक चव्हाण होते. यावेळी शशिकांत पाटील, गोरख तावरे, प्रा. प्रमोद सुकरे, सतिश मोरे, दिलीप भोपते, खंडू इंगळे, विकास भोसले, अमोल चव्हाण, सुभाष देशमुखे, पराग शेणोलकर, नितिन ढापरे, मुख्याध्यापक दिपक पवार, विशाल पाटील, सकलेन मुलाणी, प्रकाश पिसाळ, शरद गाडे, तन्मय पाटील, रूपाली जाधव, प्रियांका पाटील आदी उपस्थित होते.

एस. एम. देशमुख म्हणाले, वृत्तपत्रांचा खप दिवसेन दिवस कमी होत आहे, ही बाब चिंतेची आहे. तसेच सोशल मिडियातील बदलामुळे वृत्तपत्रांत काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. वृत्तपत्रांच्या जागी आता इलेक्ट्रॉनिक्स मिडिया बरोबर वेब, युट्यूब यासारख्या सोशल मिडिया स्थान घेत आहे. पत्रकार संरक्षण कायद्यामुळे कोणत्याही प्रिंटमधील दैनिकांसह, साप्ताहिके, मासिके व इलेक्टॉनिक्स मिडियात काम करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तिला संरक्षण मिळणार आहे, काही निकष आहेत ते सर्वांनी समजून घ्यावेत. या लढ्याला फार मोठा संघर्ष करावा लागला, मात्र आता केवळ संरक्षण गरजेचे नसून आता पत्रकारांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. कारण आपल्या बरोबर आपले कुटुंब असते, परंतु त्या पत्रकारांच्या पाठिमागे त्या कुटुंबाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण लढा देणे गरजेचे आहे, मात्र त्यासोबत प्रत्येक तालुका, जिल्हा पत्रकार संघानी एक स्वतंत्र व्यवस्था करावी. जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या वाईट काळात, पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला सावरता येईल.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!