Thu. Aug 6th, 2020

हिंजवडी मेट्रोसाठी आवश्यक शासकीय जागा लवकरच हस्तांतरित- उपमुख्यमंत्री अजित पवार

शबनम न्यूज : मुंबई (दि.१४ जानेवारी २०२०) :- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जागा हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक कार्यवाही करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली.

पुणे महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले,की पुणे, पिंपरी चिंचवड शहरे आणि पुणे जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांचा पीएमआरडीएमध्ये समावेश आहे. त्यामुळे पीएमआरडीएचे कार्य जिल्ह्य़ाच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वाचे आहे. पीएमआरडीएकडून करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी राज्य शासनाची १५ हजार चौ. मी. जागा आवश्यक आहे. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.

पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमातनतळाला पुणे शहर आणि जिल्ह्य़ातून जलद पोहोचता येण्यासाठी रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी-शेवाळवाडी मेट्रोसाठी भूसंपादन तसेच अन्य बाबी तातडीने मार्गी लावाव्यात. पीएमआरडीएच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्त्रोत, पीएमआरडीएकडून करण्यात येणारे वर्तुळाकार रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग – टीपी स्कीम), गृहप्रकल्प, इंद्रायणी नदीसुधार, पीएमआरडीएच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी प्रकल्पांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी घेतला. मुंबईत मंत्रालयात ही बैठक झाली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे या वेळी उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!