फेब्रुवारीत “आरटीई’’ प्रक्रिया सुरू करण्यात येणार
यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी होणार
शबनम न्यूज : पुणे (दि.१४ जानेवारी २०२०) :- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार असून प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी करावी लागणार आहे.
“आरटीई’अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता मिळविण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते. त्यास शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. प्रवेशाबाबत उपसचिव राजेंद्र पवार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यासाठी प्राथमिक बैठका सुरू झाल्या आहेत. येत्या 16 जानेवारी रोजी “एनआयसी’तील अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून यात प्रवेशाचे वेळापत्रक, पूर्वतयारी, तांत्रिक अडचणींवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
दरवर्षी प्रवेशासाठी तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येत होती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया शाळा सुरू झाल्या तरी चालूच राहत होती. मागील वर्षात प्रवेशासाठी चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य शाळांमधील प्रवेशाच्या जागा रिक्तच पडल्या होत्या. आता मात्र एकादाच लॉटरी काढण्यात येणार आहे. उपलब्ध जागांसाठी लॉटरी काढून त्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ठराविक कालावधीसाठी मुदत देण्यात येणार आहे. जेवढ्या उपलब्ध जागा आहेत तेवढ्या जागांसाठी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. लॉटरीतील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. येत्या मे अखेरपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही शासनाकडून जारी करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा
पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवावी. त्यामुळे नंतर धावपळ उडणार नाही. प्रवेशासाठी आधी शासनमान्यता प्राप्त शाळांची व उपलब्ध जागांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.