Thu. Aug 6th, 2020

इन्स्टाग्राम च्या माध्यमातून नर्सला ११ लाखांची फसवणूक

शबनम न्यूज : पुणे (दि. १६ जानेवारी २०२०) – इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे एका नर्सला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून अमेरिकेत कॅप्टन पदावर नोकरीला असल्याचे सांगत सायबर चोरट्याने नर्सला गिफ्ट पाठविल्याची बतावणी करून तब्बल ११ लाखांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत येरवडा परिसरातील एका ३२ वर्षीय नर्सने तक्रार दिली आहे. त्यानुसार डेविल विल्सम्स नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका नामांकित रुग्णालयात नर्स म्हणून कामाला आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. पाच महिन्यांपूर्वी ‘इन्स्टाग्राम’वर त्यांची डेव्हिड विल्यम्स नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर मोबाइलवरदेखील त्यांच्यात संपर्क होऊ लागला. आरोपी डेव्हिडने तो अमेरिकेत कॅप्टन पदावर नोकरीला असल्याची बतावणी केली. त्यानंतर डेव्हिडने महिलेला अमेरिकेतून गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला ‘कस्टम’मधून बोलत असल्याचा फोन आला. ‘तुमचे महागडे गिफ्ट आले असून ते ‘कस्टम’ने पकडले आहे. तो सोडवून घेण्यासाठी ७० हजार रुपये ऑनलाइन जमा करावे लागलीत. महिलेने यांनी डेव्हिडला फोन करून खात्री केली. त्या वेळी त्याने गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने डेव्हिडने सांगितलेल्या खात्यावर ७० हजार रुपये भरले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्याने आठ दिवसांमध्ये ११ लाख रुपये एका बँकेच्या खात्यावर भरायला लावले. त्यानंतरही तो पैसे मागत होता. त्यामुळे महिलेला संशय आला. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्याकडे तक्रार दिली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!