महिला प्राध्यापिका अंजली महाजन यांच्यावर अमोनिया अॅसिडने हल्ला
शबनम न्यूज : नागपूर (दि. १६ जानेवारी २०२०) – शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख अंजली महाजन यांच्यावर सहकारी कर्मचारी महिलेने अमोनिया अॅसिडने हल्ला केला. अमोनिया अॅसिड हे कमी ज्वलनशील रसायन असल्याने व महाजन यांनी प्रसंगावधान बाळगल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
नीलिमा शेंडे असे अॅसिड फेकणाऱ्या महिलेचे नाव आहे. नीलिमा शेंडे या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. गेल्या महिन्यापर्यंत त्या महाजन यांच्याच विभागात कार्यरत होत्या. पण, वर्षभर त्या नियमित सुट्टय़ा घेत. त्यामुळे महाजन यांना इतर प्रयोगशाळेच्या सहाय्यकांची मदत घ्यावी लागे. दरम्यान, महाजन यांनी शेंडे यांचा गैरहजरीचा अहवाल प्राचार्याना सादर केला. त्यामुळे डिसेंबर २०१९ या महिन्याचे वेतन शेंडे यांना मिळू शकले नाही. याचा राग त्यांच्या मनात होता. शिवाय शेंडे कौटुंबिक समस्यांमुळेदेखील तणावात होत्या. सहा डिसेंबरला त्यांची बदली रसायनशास्त्र विषयाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली. या तणावात त्या एका चंचूपात्रात अमोनिया अॅसिड घेऊन दुपारी १२ वाजता महाजन यांच्या कक्षात पोहोचल्या. त्या दारावर पोहोचताच महाजन यांना संशय आला. शेंडे यांनी चंचूपात्रातील अॅसिड महाजन यांच्यावर फेकले. त्यांनी वेळीच आपली ओढणी समोर केली. अमोनिया अॅसिड हा कमी ज्वलनशील असल्याने त्यांना कोणतीच इजा झाली नाही.