छत्रपतींशी तुलना करण्याचा मूर्खपणा भाजपने केला-संजोग वाघेरे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ जानेवारी २०२०) :- छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा मुर्खपणा भाजपने केल्या असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले आहे. आज पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी वतीने आक्रमक पणे आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपाच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकार, कार्याध्यक्ष योगेश गवळी, माजी नगरसेविका शमीम पठाण, सतीश दरेकर, लाला चिंचवडे, सुनील गव्हाणे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या जय भगवान गाेयल लिखीत ”आज के शिवाजी – नरेंद्र माेदी” या पुस्तकामुळे महाराष्ट्रात राज्यभर वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकामध्ये नरेंद्र माेदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. या पुस्तकाचा आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निषेध करण्यात आला. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनाता भाजप सरकार विराेधात ”माेदी सरकार हाय हाय” अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, मागील निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला छत्रपती आशीर्वादाचा विसर पडला आहे. छत्रपतींशी तुलना करण्याचा मूर्खपणा भाजपने केला आहे. छत्रपती यापुढे कधीही होणे नाहीत त्यामुळे भाजप सरकार व गोयल यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
नाना काटे म्हणाले की, “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” असे पुस्तक काढून भाजपने शिवाजी महाराजांचा एकेरी नावाचा उल्लेख करताना त्यांना लाज ही वाटली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना अंगावर शहारे उभे राहतात अशा थोर छत्रपतींचा नावाचा वापर भाजप एखाद्या व्यक्तीसाठी करतो हे दुर्दैवी आहे. अशा नीच प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो.
महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर म्हणाल्या, ”भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे. यातून महाराजांना नरेंद्र माेदींच्या बराेबर आणण्याचा प्रयत्न केला जाताेय, त्याचा आम्ही निषेध करताे.
युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर म्हणाले की ,माेदींची नखाचीही तुलना व महाराजांशी बराेबरी हाेऊ शकत नाही. हे पुस्तक म्हणजे शिवभक्तांचा अपमान आहे. भाजपाला याबाबत माफी मागावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील जनतेच्या आराध्य दैवत आहे याच्याशी प्रतारणा करणाऱ्या भाजपला यांचा कधीही माफ करणार नाही असे म्हणाले.