खा. राऊत यांच्या विधानांमुळे राज्यात भिषण परिस्थिती – चंद्रकांत पाटील
स्व. इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीची चौकशी व्हावी…..चंद्रकांत पाटील
आ. महेश लांडगे यांची भाजपा शहराध्यक्षपदी निवड
शबनम न्यूज : पिंपरी (दि. 16 जानेवारी 2020) – स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ म्हणून गौरव केला होता. त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी शिवसेनेचेखासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. खा. राऊत यांच्या बेजबाबदार विधानांमुळे राज्यात भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. स्व. इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या विषयी खा. राऊत यांनी केलेले वक्तव्य खरे कि खोटे त्याचा खुलासा कॉंग्रेसने करावा व सरकारने त्याचा तपास करावा. असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी येथे केले.
गुरुवारी (दि. 16) भाजपा शहर कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा शहराध्यक्षपदी निवड जाहिर केली. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा ॲड. माधवी नाईक, खासदार अमर साबळे, मावळते भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, भाजपा युवा शहराध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे, भाजपा महिला शहराध्यक्षा शैला मोळक, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, भाजपा प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, अमित गोरखे, भाजपा शहर उपाध्यक्ष मोरेश्वर शेडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, संजय मंगोडेकर आदींसह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित शहराध्यक्ष आ. लांडगे यांचे उपस्थितांनी लाडू भरवून अभिनंदन केले.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. पाटील म्हणाले की, 2012 साली खा. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली होती. गोयल यांनी लिहिलेले पुस्तक हे काही भाजपाचे प्रकाशन नाही. गोयल हे भाजपाचे पदाधिकारी नाहीत. त्यांनी पुस्तक मागे घेतल्यामुळे हा वाद मिटला आहे. आ. लक्ष्मण जगताप यांच्या शहराध्यक्षपदाच्या कार्यकालात भाजपाचे 77 नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवडून आले. त्यांच्या कार्यकालात शहरात भाजपाचे संघटन वाढले आहे. आता पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी युवा नेतृत्व म्हणून आ. महेश लांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आ. लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भाजपाचा आणखी विकास होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांनी व्यक्त केला.