पुण्यभूषण फाऊंडेशन ‘ ची २७ वी ‘दिवाळी पहाट’ थाटात संपन्न
शबनम न्यूज : पुणे (दि. २७) – लक्ष्मीपूजनच्या पहाटेचा पुणेकरांचा उत्साह, रांगोळी -पणत्या -आकाश कंदिलांची नयनरम्य सजावट, अत्तराचा सुगंध, सनई – चौघडा, वासुदेव, पुणेरी पगडी परिधान केलेले कार्यकर्ते , शताब्दी साजरी करणाऱ्या संस्थांचा सत्कार आणि स्वर, सूर, ताल, लय , नृत्य यांची रंगलेली मैफल अशा वातावरणात ‘पुण्यभूषण ‘ पहाट दिवाळी ‘ थाटात संपन्न झाली !
महाराष्ट्राच्या ‘दिवाळी पहाट ‘संस्कृतीला सुरुवात करून देणाऱ्या ‘त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन ‘ ची ही सत्ताविसावी दिवाळी पहाट २७ ऑक्टोबर रोजी ,रविवारी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.
अवीट गोडीची अशी ‘दीप सूर तेजाळती’ ही स्वर-सूर-नृत्य -गायन मैफल होती.
या मैफलीत अमर ओक यांचे बासरीवादन, पं. विजय घाटे यांचा तबला, शीतल कोलवालकर यांचे कथक नृत्य, श्रीधर पार्थसारथी यांचे मृदंग वादन, सुरंजन रघुनाथ यांचे गायन आणि श्रीराम हसबनीस यांचे हार्मोनियमवादन पुणेकर रसिकांना ऐकता आले. अमर ओक, सागर पटोका यांनी साथसंगत केली.
जुगलबंदी, परण, ‘ बाजे मुरलीया ‘ नंतर अमर ओक यांनी बासरीवर राग खमाज सादर केला. ‘धन्य भाव सेवा का अवसर पाया’ या भैरवी ने या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीची सांगता झाली.मिलिंद कुलकर्णी यांनी या बहारदार मैफलीत खुमासदार शब्दांनी रंग भरले.
‘पहाट दिवाळीची,साथ सुरेल स्वरांची’ असा अनुभव देणाऱ्या या मैफलीदरम्यान शताब्दी पूर्ण केलेल्या पुण्यातील दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महात्मा फुले वसतिगृह, डेक्कन मुस्लिम लायब्ररी आणि कँप एज्युकेशन सोसायटी या संस्थांचा सत्कार केला करण्यात आला.
रवींद्र जोशी ( पुणे प्रेस असोसिएशन ), शरद कुंटे ( डेक्कन एज्युकेशन सोसायटी,) अरुण कुदळे, दीपक कुदळे ( महात्मा फुले वसतीगृह ), आबेदा इनामदार ( डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट लायब्ररी ), वालचंद संचेती ( कँप एज्युकेशन सोसायटी ) यांनी सत्कार स्वीकारला. आबेदा इनामदार यांनी पुण्यभूषण फाऊंडेशन ‘ च्या सांस्कृतिक उपक्रमांना १ लाख देणगी जाहीर केली.
कृष्णकुमार गोयल,उदय जाधव , राजेश गोयल, ‘ हिरकणी ‘ चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, धनंजय गोखले ( मैत्र फाऊंडेशन ) हे उपस्थित होते.
‘त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, “पहाट दिवाळीचा कार्यक्रम करण्यास प्रथम ‘त्रिदल’ ने १९९२ पासून सुरवात केली. आता विदेशातही मराठी मंडळी ‘दिवाळी पहाट कार्यक्रम करू लागले आहेत.
संस्थेने या कार्यक्रमाचे वेगळेपणही जपले आहे.यात पाच पुणेकरांचा ‘पक्के पुणेकर’ असा सन्मान केला जातो.
गायिका किशोरी आमोणकर ते पंडित जसराज यांसारख्या दिग्गज कलाकारांनी ‘पहाट दिवाळी’ची मैफल आपल्या दिव्य स्वरांनी सजवलेली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात गायन-वादन केले आहे. “
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.सुरेश ( काका ) धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले.