पुणे महापालिकेनेही नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवावेत
शबनम न्युज : पुणे (दि. ०८) – नाट्यगृहात प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांमध्ये अचानक फोनवर बोलणाऱ्या काही अरसिकांमुळे इतर प्रेक्षक आणि कलाकारांचाही हिरमोड होतो. यावर आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. या निर्णयाचे स्वागत करून कलाकारांनी पुणे महापालिकेनेही नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवावेत, अशी मागणी केली. मुंबई महापालिकेचा निर्णय अत्यंत स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया कलाकार विश्वातून उमटल्या आहेत.
अनेकदा प्रेक्षागृहात मोबाइलची रिंगटोन वाजल्याने किंवा एखादा प्रेक्षक फोनवर बोलू लागल्याने प्रयोगांमध्ये अडथळा यायचा. अनेक कलाकारांनी याला वैतागून प्रयोग थांबवल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रयोगापूर्वी मोबाइल बंद किंवा सायलेंट करण्याच्या सूचना देऊनही प्रेक्षकांकडून त्याचा सर्रास वापर केला जात होता. यावर अनेक दिवसांच्या चर्चा घडल्या. कलाकारांनी सोशल मीडियांवरून मोबाइल वापरणाऱ्यांवर सडकून टीकाही केली. अखेर मुंबई महापालिकेतील नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी नाट्यगृहांमध्ये मोबाइल जॅमर लावण्याचा प्रस्ताव दिला होता. तो मान्य करत पालिकाप्रशासनाने लवकरच मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख नाट्यगृह असलेल्या बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह आणि गणेश कला क्रीडा मंच या नाट्यगृहांमध्ये मोबाइल जॅमर लावण्याची मागणी पुणेकर कलावंतांकडून करण्यात आली आहे. या चारही नाट्यगृहांमध्ये सातत्याने नाटकांचे प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. हजारो नागरिक या कार्यक्रमांसाठी उपस्थित असतात. त्यांच्या फोनमुळे इतरांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून ‘जॅमर’ लावले तर रसभंगाची समस्या नाहीशी होईल, असे कलाकारांचे म्हणणे आहे.