Thu. Jul 9th, 2020

दिवसाआड पाणीपुरवठा म्हणजे अकार्यक्षमतेची कबूलीच : सचिन साठे

शबनम न्यूज : पिंपरी (दि. १९) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी सरासरीपेक्षा 127 टक्क्यांहून जास्त पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. आजही मागील वर्षीपेक्षा 17 टक्के जास्त जलसाठा म्हणजेच काल प्रसिद्ध झालेल्या आकडेवाडीनुसार धरण पूर्ण भरलेले आहे. जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे सोडण्यात आले. मुबलक पाणीसाठा असतानाही निव्वळ आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना अपु-या पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबुलीच आहे. प्रशासनावर अंकुश निष्क़्रिय ठरलेल्या आयुक्तांनी राजीनामा द्यावा हाच यावर एकमेव उपाय असल्याचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकाव्दारे सांगितले.
मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी शहर कॉंग्रेसच्यावतीने वेळोवेळी आंदोलने, मोर्चा काढण्यात आले होते. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. नागकिरांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सत्ताधीश एकमेकांचे पाय ओढण्यात आणि सत्तेच्या खुर्च्या उबवण्यात मश्गुल आहेत. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. त्यांची निष्क्रीयता वेळोवेळी सिद्ध झाली आहे. पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. अशा निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालून शहरातील 25 लाख लोकसंख्येला वेठीस धरणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!