Tue. May 26th, 2020

शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मला भाजपची गरज नाही – उद्धव ठाकरे

SHABNAM NEWS – 8NOV. (MUMBAI)-

मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार हे वचन शिवसेनाप्रमुखांना दिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी भाजपावर सडेतोड टीका करत अनेक आरोप केले.

मी शिवसेनाप्रमुखांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. “मला अमित शाहांचा फोन आला होता, काय पाहिजे? अशी विचारणा त्यांनी केली होती मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन सांगितलं. ते म्हणाले ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, मी म्हणालो, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचं,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

“शिवसेना प्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली होती. त्यावेळी अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका, वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेल असं म्हटलं होतं. तसंच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी अडचण होईल असं नमूद केलं होतं,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“मी नरेंद्र मोदींवर कधीच टीका केलेली नाही. त्यांनी मला धाकटा भाऊ मानलं आहे, भावा-भावाचं नातं पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा मोदींनी शोध घ्यावा,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही टीकेची पर्वा न करता गेली पाच वर्ष सत्तेत असूनही जनतेची बाजू मांडत राहिलो असंही ते म्हणाले.

 

 

ताज्या बातम्या