शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी
शबनम न्यूज : बारामती (दि. २८) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
राज्यातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यभरात प्रचाराचे दौरे करून राष्ट्रवादीमध्ये नवे चैतन्य निर्माण केली त्या पार्श्वभूमीवर आज भूतो ना भविष्य गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि तरुण आणि आबालवृद्धांनी अलोट गर्दी शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागेत केलेली आहे . देशात साजरे होणाऱ्या अनेक सणा पैकी दिवाळी हा सण मोठा मानला जातो… पाच दिवस साजरे होणार्या उत्सवातील पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो.
हा दिवस पवार कुटुंबीय सगेसोयरे, मित्रपरिवार, कार्यकर्ते यांच्यासाठी देतात. देशाच्या सर्वेच्च नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याबरोबरच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सुवर्ण संधी च यानिमित्ताने उपलब्ध असते म्हणूनच मागील अनेक वर्षापासून पवार साहेबांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून हजारो लोक गोविंद बागेत येत असतात. त्या प्रत्येकाला पवार भेटण्यासाठी हा खास दिवस असतो.या दिवशी सर्वसामान्यांसह सगे सोयरे, वेगवेगळ्या पक्षातील नेते,कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात.