महाजॉब्जमध्ये नोंदणी झालेल्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण- सुभाष देसाई
शबनम न्युज : १६ सप्टेंबर (प्रतिनिधी) मुंबई :- राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या महाजॉब्ज पोर्टलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख 86 हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 8403 अकुशल नोकरी शोधकांची नोंद झाली आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
महाजॉब्ज पोर्टलचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 15) मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाजॉब पोर्टलद्वारे आतापर्यंत दोन लाख 86 हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 28 हजार 167 जणांनी सर्व माहितीसह आपले प्रोफाईल पूर्ण केले आहे. त्यामध्ये 20 हजार 651 कुशल व अर्धकुशल तर 8403 अकुशल कामगार म्हणून नोंदणी झाली आहे. अकुशल नोकरी शोधकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे वर्ग करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत.
प्रथम दहा उच्चतम दर्जाचे रोजगार कौशल्य असणाऱ्या क्षेत्रांमध्ये पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट, व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रामध्ये इच्छुकांनी अधिक प्राधान्य दिले आहे. या व्यवसाय क्षेत्रातील मनुष्यबळ कंपन्यांना सुलभरीत्या उपलब्ध व्हावे, यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत.