Sun. Sep 20th, 2020

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे

शबनम न्यूज : 15 सप्टेंबर – (प्रतिनिधी) पिंपरी:-  कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी केले.

 

 

 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम दि. १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२० दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची आढावा बैठक आज स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य विलास मडीगेरी, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम १००% यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान २५ घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी. काम करण्या-या स्वयंसेवकांना मानधन द्यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.
आमदार महेश लांडगे म्हणाले, या मोहिमेमध्ये सहभागी होणा-या कर्मचा-यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा. ५० वर्षांपुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये तसेच काम करण्या-या स्वयंसेवकांना कोरोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच देण्यात यावे. प्रत्येक पथकामध्ये एक महिला, एक पुरुष स्वयंसेवक व मनपा कर्मचारी असावा असेही ते म्हणाले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, १२ स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व १२ स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे. स्वयंसेवकांना किमान १० वी पास व स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी हि मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा दि. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० दरम्यानचा असेल तर दुसरा टप्पा १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० दरम्यान असेल. यामध्ये मनपा कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान SpO2 तपासणे, Comorbid Condition,ताप खोकला, दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये संदर्भित करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरातील २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २१६६ स्वयंसेवकांच्या मदतीने हि मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन महानगरपालिकेने आखले आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!