#CRIME : शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाचा नोकरानेच केला खून
शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) नागपूर :- नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरुन वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाचा नोकरानेच डोक्यावर सळीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंगरोड परिसरात घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
प्रवीण सातपुते (वय ४२) रा. महाजनवाडी, वानाडोंगरी असे मृत ढाबामालकाचे नाव आहे. तर, याप्रकरणी तर निखिल धाबर्डे (वय २९, रा. हिंगणा) असे अटक केलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री १२ ते १ दरम्यान प्रवीण आणि आरोपीमध्ये वाद झाला. यातून प्रवीणने त्याला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. याचा राग मनात धरत प्रवीण खुर्चीवर बसलेला असताना आरोपीने पाठीमागून लोखंडी रॉडने वार केले. यात रक्तबंबाळ झाल्याने प्रवीण खाली कोसळला, तर आरोपीने पळ काढला. सकाळी एक शेतकरी परिसरात गेला असता त्याला ढाबा मालक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. त्यांनी तातडीने हिंगणा पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन शोध घेऊन आरोपीला काही तासांतच अटक केली.