नाशिकमध्ये आतापर्यंत ११ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी
शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी)नाशिक :- शहर आणि परिसरात करोनाचे नवीन रुग्ण सापडत असल्याने बाधितांचा आकडा १५ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असला तरी दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत ११ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्य़ात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.१९ टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत ४९९ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात फिरत्या वाहनाद्वारे होणारी आरोग्य तपासणी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालानुसार सद्यस्थितीत दोन हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक शहरात करोनाचा आलेख उंचावत आहे. २४ तासात ५७४ रुग्ण आढळले. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण नाशिक शहरातील आहेत. शहरातील करोनाबाधितांचा आकडा साडेनऊ हजारचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून यातील सात हजार ३०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.