अण्णाभाऊ साठेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाइनद्वारे जन्मशताब्दी महोत्सव होतोय साजरा
शबनम न्यूज : ०2ऑग. (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याने ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मिडीयाद्वारे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी निगडी येथील सावरकर भवन येथे दिनांक १ ते ५ ऑगस्ट २०२० दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑनलाईन प्रबोधन पर्व वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या कार्यावर आधारित वेबसाईटचे उदघाटन आज महापौर माई ऊर्फ उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी, निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी, रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधाताई गोरखे, कमलताई घोलप, सुमनताई पवळे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, पदाधिकारी विशाल कसबे,सचिन पारवे, सुनील भिसे, गणेश खण्डाळे, संदीपान झोम्बाडे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरलमल, नाना सरोदे, माजी नगरसदस्य प्रल्हाद सुधारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य घराघरात पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे त्यामुळे या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अण्णाभाऊंचे विचार आपल्याला खूप उंचावर न्यायचे असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घरबसल्या होणार असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी. कोरोनाचे सावट संपूर्ण देशात तसेच पिपरी चिंचवड शहरात देखील आहे. आणि आण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहात्सव पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आणाभाऊंचे विचार समजापर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ५ दिवसाच्या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आण्णाभाऊ साठे यांची जागतिक साहित्यिक म्हणून ओळख आहे. त्यांचे विचार या माध्यमातून घराघरात पोहचणार आहेत. त्याचा लाभ सर्वानी घ्यावा, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.