देशसेवा हाच सावरकरांचा ध्यास – शरद पोंक्षे
शबनम न्युज : – पिंपरी : विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन आणि विचार राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरले आहेत. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांना एका विशिष्ट साचामध्ये बांधून ठेवले, त्यामुळे त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यात अडथळे आले, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात शरद पोंक्षे बोलत होते. कार्यक्रमात आपलं घर पुणेचे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना यावर्षीचा श्री मोरया जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्य विश्वस्त मंदार देवमहाराज, विश्राम देव, आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे, डॉ. प्रवीण दभडगाव आदी उपस्थित होते.
या वेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, गिरिजा लांडगे, रमाकांत परांजपे, रमाकांत पवार, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अनिल गुंड, प्रा. राजकुमार कदम, स्नेहवनचे अशोक देशमाने, सुनील तापकीर, किसन चौधरी, अक्षय घाणेकर, चलसानी व्यंकटसाई, श्रीकांत देव आदींना मोरया पुरस्कार देऊन गौरविले.
शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘सावरकरांनी २२ हजार पानांचे साहित्य लिहिले आहे. मित्रमेळा नावाच्या संघटनेपासून अभिनव भारत संघटना त्यांनी स्थापन केली. यामागे केवळ राष्ट्रभक्तीच होती. लहानपणापासून त्यांच्यात संपूर्ण स्वातंत्र्याचे बीज पेरले गेले होते. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिंदुत्वाचा पुरस्कार केला. धर्माबद्दलची कट्टरता नको, कट्टरता राष्ट्रभक्तीची असायला हवी. सुरक्षा व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला हव्यात. तसेच स्वातंत्र्यानंतर एका वर्षात भारताने अण्वास्त्र निर्मितीमध्ये प्रगती करायला हवी, असा सावरकरांचा नेहमी आग्रह होता. आज प्रत्येक नागरिकाने गरजेपुरतेच आर्थिक सक्षम व्हायला पाहिजे. त्यानंतरचा सगळा वेळ राष्ट्रभक्तीसाठी द्यायला हवा. आज पुन्हा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढण्याची गरज नाही. किंवा केवळ त्याच माध्यमातून देशभक्ती होते असे नाही. तर दररोजच्या नियमित कामामधूनसुद्धा देशभक्ती जगवता येते.’’
बुधवारी सकाळी सहाला गोंदवलेकरमहाराज आरती मंडळाने काकड आरती केली. त्यानंतर श्री मोरया गोसावी चरित्र पठण केले. सकाळी नऊला महिलांचे सामुदायिक श्रीसूक्त पठण व कुंकुमार्जन झाले. याचे संचालन विद्या विघ्नहरीमहाराज देव यांनी केले. तर संयोजन नारायण लांडगे यांनी केले. वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. याचे संयोजन नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केले.