वडमुखवाडीत टेस्ट सेंटर सुरू करा – मनसे विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांची महापालिकेकडे मागणी

शबनम न्यूज : २२ जुलै ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड –कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एंटीजन रॅपिड टेस्ट तातडीने होणे गरजेचे आहे. तरी दिघीगाव, बोपखेल, च-होली, मोशी, डुडुळगाव येथील नागरिकांसाठी वडमुखवाडी येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात कोरोना रेपीड टेस्ट सेंटर सुरू करावे, अशी मागणी मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अंकुश तापकीर यांनी महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी शैलजा भावसार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांची कोरोना चाचणी करून कोरोनाचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

शहरात अॅन्टिजन रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत. दिघी, बोपखेल, च-होली, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी येथील नागरिकांची देखील अॅन्टिजन रॅपिड टेस्ट व्हावी. या गावांसाठी तातडीने पुणे आळंदी रोडवरील वडमुखवाडीतील कृषी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत रॅपीड टेस्ट सेंटर सुरू करण्यात यावे. कोरोना चाचण्या जास्तीत जास्त होतील. तसेच, चाचणीचा रिपोर्ट हा एक तासाच्या आत नागरिकांना व रुग्णांना तातडीने उपलब्ध होईल. मनसेच्या निवेदनाचा आणि या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अन्यथा भोसरीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भोसरी विधानसभा मनसे अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी दिला आहे.