#CRIME : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा खून
शबनम न्युज : पुणे (दि. २८ मे ) – पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा काही तासात टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री येरवड्यात घडली. नितीन शिवाजी कसबे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. कसबे हा कालच येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटला होता. पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपीचा खून होण्याची पुण्यातील ही तिसरी घटना आहे.
येरवडा पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ४ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नागेश राजू कांबळे (वय २५, रा. गोसावीवस्ती, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश कनचिले, आकाश सपकाळ, आकाश मिरे, गणेश आडसूळ, निखिल कांबळे, चेतन भालेराव, ओंकार, सोनवणी अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शादलबाबा चौक ते पर्णकुटी चौकदरम्यानच्या रोडवर रात्री पावणेअकरा वाजता घडली.