#PUNE : पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित
शबनम न्युज : पुणे (दि. २८ मे ) – पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी करणे आवश्यक असून त्यानुसार जलसंपदा विभागाने जिल्ह्य़ातील सर्व धरणांची तपासणी केली. सर्व धरणे सुरक्षित असल्याचा दावा या विभागाकडून करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्य़ाच्या परिसरात धरणांचे जाळे आहे. जिल्ह्य़ात पाच प्रमुख नद्या आहेत आणि त्यांच्या पाण्यावर तब्बल २५ धरणे आहेत. त्यातून पुणेकरांची तहान भागवली जाते आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी दिले जाते. पुण्यातून वाहणारी मुठा, पिंपरी-चिंचवडमधून जाणारी मुळा या प्रमुख नद्यांबरोबरच घोड, भीमा आणि निरा या नद्यांचे पाणी साठवण्यासाठी ठिकठिकाणी धरणे बांधली आहेत. गळती सुरू झाल्याने टेमघर धरणाचे काम करण्यात येत आहे. वडिवळे आणि डिंभे तसेच वरसगाव धरणाची गळती रोखण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून गेल्याच वर्षी स्पष्ट करण्यात आले आहे. धरणांच्या पावसाळ्यापूर्वी करायच्या आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या असून सर्व धरणे सुरक्षित आहेत.