पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पुढील सर्वसाधारण सभा होणार व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे ?
शबनम न्युज : पुणे (दि. २७ मे ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्यातून एकदा घेण्यात येते.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेले दोन महिने सभा तहकूब करण्यात आली होती.त्यामुळे बजेट सारख्या अनेक महत्त्वाच्या कामांना सभेची मंजूर घेणे आवश्यक आहे.याबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज आयुक्त कक्षात सर्व पदाधिकारी व विविध पक्षाचे गटनेते यांचेसोबत महानगरपालिकेचीव्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सभा घेता येईल का याबाबत बैठक आयोजित केली होती.
बैठकीस सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,आयुक्त श्रावण हर्डीकर,विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे,मनसे गटनेते सचिन चिखले,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,नगरसचिव उल्हास जगताप,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपस्थित होते. बैठकीत १ जून रोजी सर्वसाधारण सभा घेणेबाबत चर्चा करण्यात आली.तसेच काही सदस्यांना सभागृहात उपस्थित राहून काही सदस्यांना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी करता येईल का याबाबतीत गटनेत्यांबरोबर विचारविनीमय करण्यात आला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना परिस्थितीची उपस्थितांना माहिती दिली तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या नमुने तपासणीसाठी खाजगी संस्थांमार्फत आवश्यकतेनुसार चाचण्यामधे वाढ करण्याबाबत व चाचण्यांची संख्या वाढविली तर कोरोना आकडेवारी कमी होण्यास मदत होईल तसेच वेळेची बचत होईल असे मत व्यक्त केले.त्यावर बैठकीत चर्चा होऊन सर्व उपस्थितांनी खाजगी चाचण्या करण्याबाबत सहमती दर्शवली.