Tue. May 26th, 2020

6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शबनम न्यूज : पुणे (दि. ०४) – अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात येत असून संबंधित विभागांना तसेच आदेश दिले आहेत, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करून 6 नोव्हेंबर पर्यंत पंचनामे पूर्ण करा, असे आदेश दिले.

          पुरंदर तहसील कार्यालयात पुरंदर, बारामती, इंदापूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

          यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे,  तहसीलदार रुपाली सरनोबत, सोनाली मेटकरी, विजय पाटील आदी उपस्थित होते.

          बाधित क्षेत्रांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, आवश्यकता भासल्यास पंचनाम्याची पथके वाढविण्यात यावीत, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

          प्राथमिक स्तरावर 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित मदत केंद्र सरकारकडे मागू. हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याने  शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही ते म्हणाले.

          पालकमंत्री पाटील यांनी प्रारंभी तालुकानिहाय नुकसानीचा आढावा घेतला.

          तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी, हिवरे येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

 

ताज्या बातम्या