PUNE : राज्यातील शाळा १ जुलै पासून सुरु होण्या ची शक्यता
शबनम न्यूज ३० मे ( पुणे ) – कोरोनाच्या संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन, राज्यातील शाळा १ जुलैला सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध शक्यतांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांनाही यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा कधी सुरू होतील, या प्रश्नाबाबत पालक आणि मुख्याध्यापकांची सातत्याने चर्चा सुरू आहे. याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार म्हणाले, ‘जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचे काहीही ठरलेले नाही. मी कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा एक जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. एक जुलै रोजी शाळा सुरू केल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस बुडतील. या सर्व बुडालेल्या दिवसांची भरपाई ही दिवाळी आणि नाताळची सुट्टी कमी करून करता येईल. त्यानंतर एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्याही कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे.’ करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, शाळा १५ जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.