Mon. Mar 30th, 2020

chinchwad : नागरिकांनो, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना गर्दी टाळा – नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन

प्रभागातील दुकानांमध्ये नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा ‘सोशल डिस्टन्सिंग’ फंडा

शबनम न्युज : पिंपरी (दि. २६ मार्च ) – करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी सांगितले. सर्व जनतेने पुढील २१ दिवस घरातच राहावे अशी विनंती मोदींनी देशातील लोकांना केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी प्रभागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

 

 

 

करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हा एकमेव उपाय असून त्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचनाही करण्यात येत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर गर्दी करीत असून त्यामुळे आजार पसरण्याचा धोका आहे.

 

 

 

या पार्श्वभूमीवर नगरसेवक त्रिभुवन यांनी आज सकाळी महापालिका अधिकारी आणि वाकड पोलिसांच्या सहकार्याने नखाते चौक परिसरातील किराणा दुकान आणि मेडिकलसमोर खरेदीसाठी येणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी प्रत्येकी 3 फूट अंतरावर चौकट आणि रिंगण केले होते. जेणेकरून येणारे नागरिक त्या रिंगणात उभे राहतील व दोन लोकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल. व कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका टाळण्यात येईल.

 

 

 

यासंदर्भात बोलताना नगरसेवक त्रिभुवन म्हणाले की, एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेता देशभरात सोशल डिस्टन्सिंग अर्थात सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. याचाच एक प्रयोग आज आम्ही रहाटणी येथील काही दुकानांसमोर केला असून आजपासून संपूर्ण प्रभागातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर अशाप्रकारे दोन नागरिकांमध्ये अंतर राखण्यासाठी 3 फूट अंतरावर रिंगण आखण्यात येणार आहे. नागरिकांनीही घाई गडबड न करता या रिंगणात उभे राहूनच वस्तूंची खरेदी करावे. स्वत: सुरक्षित राहावे व इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन नगरसेवक त्रिभुवन यांनी यावेळी केले आहे.

 

ताज्या बातम्या