पतंग उडविताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
शबनम न्यूज : नाशिक (दि. १५ जानेवारी २०२०) – येथील नायगावरोड परिसरात ऐन मकरसंक्रांतीच्या सणाला दुर्देवी घटना घडली आहे. येथे पतंग उडविताना एका बारा वर्षीय मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार (दि. १५ जानेवारी रोजी) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे पतंगबाजीला गालबोट लागले आहे. तर आयर्न विलास नवाळे (वय- १२ .रा. संतहरी बाबा नगर नायरोडरोड, सिन्नर) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
याप्रकरणी सिन्नर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मकरसंक्रातीच्या दिवशी शहर परिसरात सगळीकडे पंतग उडविले जातात. येथे मुलेही पतंग उडविण्याचा आनंद घेत होती. नायगाव रोड येथे आयर्न हा सकाळी १०.३० च्या सुमारास पंतग उडविण्यात मग्न असताना धनंजय हरिभाऊ जाधव यांच्या विहिरीत पाय घसरून पडला. याची माहिती सिन्नर पोलिस आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला विजय बबन बोर्हाडे यांनी दिली. त्यावेळी माहिती मिळताच सिन्नर पोलिस आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आयर्न याला विहिरीतून बाहेर काढले. त्याला नगरपालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषीत केले. यानंतर सिन्नर पोलिस ठाण्यात आयर्न याची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. एम. धुमाळ करीत आहे.