नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा “महाराष्ट्र केसरी” कुस्ती स्पर्धेचा मानकरी
शबनम न्यूज : पुणे (दि.०७ जानेवारी २०२०):- नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा 3-2 असा पराभव करुन, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन, खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचं दर्शन घडवलं. दोस्तीत कुस्ती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. दोन्ही मल्ल हे काका पवार यांच्या तालमीतील आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे.
विजयी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली. हर्षवर्धन सदगीर 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मानकरी ठरला.
लातूरच्या शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या काका पवारांच्या दोन्ही पठ्ठ्यांनी फायनलमध्ये (Maharashtra Kesari Kusti Final) धडक मारली . या दोघांमध्ये मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्यात लढत झाली. गतवर्षीचा विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार हे निश्चित होतं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूरचा शैलेश शेळकेने माती विभागात सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेवर 11-10 अशा अटीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने मॅट विभागात गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला 5-2 ने पराभूत केलं. विशेष म्हणजे शैलेश आणि हर्षवर्धन हे पुण्याच्या काका पवार यांच्या तालमीचे मल्ल आहेत. या दोघांनीही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात एकत्रच सराव केला आहे. त्यामुळे यंदाची मानाची गदा काका पवार यांच्या तालमीत जाणार होती.