WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?
Thu. Feb 20th, 2020

मला भावलेले साहेब…

पत्रकार तुलसीदास शिंदे यांच्या लेखणीतून … 
शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास..
          आपल्या महाविद्यालयीन काळापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी चर्चेत असणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते माजी केंद्रीय मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब… यांचा आज वाढदिवस. साहेबांना प्रत्यक्ष भेटून या शुभदिनी शुभेच्छा देण्याची संधी खूपच कमी लोकांना मिळते. मात्र, दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी बारामतीत गोविंद बागेत जाऊन त्यांना भेटून शुभेच्छा देण्याची संधी लाखो कार्यकर्त्यांना मिळते. 90च्या दशकात साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रीमंडळात माळी समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून ज्येष्ठ नेते ॲड. बी.डी. तथा अण्णासाहेब झुटे यांना अन्नधान्य पुरवठा राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासणा-या झुटे अण्णांचे राज्यमंत्रीपदावर असताना वार्धक्यामुळे निधन झाले. त्यानंतर माळी व ओबीसी समाजाच्या व्यक्तीला मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना शिष्टमंडळाच्या माध्यमातून साहेबांना भेटत होत्या. मराठवाड्यातील आमदार भीमराव धोंडे यांना मंत्रीमंडळात घ्यावे यासाठी माझ्यासह राज्यभरातील ओबीसींचे अनेक कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यातून तारा पाठवून विनंती करीत होते. साहेबांना विनंती करण्यासाठी मुंबईत गेलेल्या एका शिष्टमंडळात युवक कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी साहेबांनी शिष्टमंडळाचे निवेदन घेतले आणि लवकरच तुमच्या समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व देऊ असे सांगितले. त्यानंतर 1991 साली महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली.
ॲड. बी.डी. झुटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत प्रदेश कॉंग्रेसच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे अध्यक्षपद शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणा-या आमदार छगन भूजबळ यांना देण्यात आले. या सभेस साहेब शेवटपर्यंत उपस्थित होते. यानंतर पडद्यामागे अनेक राजकीय अनपेक्षित घटना घडल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेनेचा माणिक’ म्हणून ज्यांचा जाहिर सन्मान केला त्या छगन भूजबळांना साहेबांनी
शिवसेनेतून फोडून राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी दिली. छगन भूजबळ यांनी शिवसेना सोडताना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीस शिवसेनेचा विरोध हे जरी कारण सांगितले असले तरी, त्यावेळी साहेबांच्या मनात राज्याचे सामाजिक, प्रादेशिक समीकरण जुळविणे हेच मुख्य असल्याचे दिसते. महिलांना आरक्षण, मंडल आयोगाची अंमलबजावणी, विद्यापीठ नामांतरण असे अनेक धाडसी निर्णय साहेबांनी त्यावेळी घेतले. त्याची राजकीय किंमत त्यांना पुढे सत्तागमावून मोजावी लागली.
1994ला छगन भूजबळ यांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील महात्मा फुले वाड्याचा कायापालट केला. ‘महात्मा जोतीराव फुले राष्ट्रीय स्मारका’चा लोकार्पण सोहळा तत्कालिन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कॉंग्रेसचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष सिताराम केसरी, केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद असे अनेक दिग्गज राष्ट्रीय नेते पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर उपस्थित होते.
1995ला प्रथमच युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. या निवडणुकीनंतर दिड महिन्याने पुण्यात हॉटेल सेंट्रल पार्क येथे साहेबांनी निवडणुकीचे विश्लेषण करणा-यासाठी बैठक घेतली यामध्ये छगन भूजबळांसह अनेक पराभूत उमेदवार उपस्थित होते. यावेळी शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर मलाही उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभांचा राजकीय, सामाजिक, सांखिक माहिती साहेबांनी अखंडपणे तीन तास उभे राहून दिली. यावेळी त्यांनी कोणताही पेपर हातात घेतलेला नव्हता. भाषणाची पूर्वतयारी म्हणून कोणतेही टीपण त्यांच्या हातात नव्हते. 288 विधानसभा मतदारसंघात आपण कोणाला, का? उमेदवारी दिली. त्यांचे व विरोधी उमेदवारांचे नाव, त्यांची पार्श्वभूमी, त्या उमेदवाराला मिळालेली मते, त्यांच्या विजय-पराजयाची विस्तृतपणे कारणमीमांसा साहेबांनी आपल्या तीन तासाच्या मार्गदर्शनात मांडली.
यापूर्वी साहेबांचे भाषण ऐकण्याची संधी मला पुण्यात जनसंघाचे उमेदवार जगन्नाथ जोशी आणि कॉंग्रेसचे उमेदवार बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या निवडणुक प्रचार काळात मिळाली होती. तेव्हापासूनच साहेबांचे व्यक्तीमत्व मला भावले. 1999ला साहेबांनी स्वाभिमान दुखावताच अत्यंत धाडसाने कॉंग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 10 जून 1999ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. राज्यभर फिरून पक्षसंघटन वाढवले. पुढे 15 वर्ष राज्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस बरोबर आघाडीचे सरकार राहिले. 1999 साली नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मी पुण्यातील महात्मा फुले पेठेतून पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत रहायला आलो. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाची जबाबदारी साहेबांनी वसंत लोंढे यांच्यावर सोपविली. छगन भूजबळ यांनी  स्थापन केलेल्या महात्मा फुले समता परिषदेच्या प्रसिद्धीच्या कामात माझे योगदान पाहून भुजबळ यांनी माझी शिफारस साहेबांकडे केली. त्यानंतर मला पिंपरी  चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रसिद्धीचे काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक बैठकांमध्ये साहेबांना जवळून  पाहण्याची व ऐकण्याची संधी मला मिळाली. साहेबांचा वक्तशीरपणा, सामान्य कार्यकर्त्यालादेखील प्रोत्साहन देणारे साहेबांचे संघटनकौशल्य, प्रशासनावरील त्यांची  पकड, काम करण्याची हातोटी, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याची कार्यशैली, कोणताही निर्णय घेताना त्याचे राजकीय, सामाजिक पडसाद याबाबत नेहमीच मला आदर  आहे. लघुउद्योजक, शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी यांना केंद्रबिंदू मानून साहेबांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्र, अर्थ व उद्योग क्षेत्रात अग्रेसर  राहिला. राज्याच्या व देशाच्या राजकारणात जेव्हा जेव्हा अडचणीचा काळ आला तेव्हा दुरदृष्टी ठेवून निर्णय घेण्याची क्षमता साहेबांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे.
या जाणत्या राजाला उदंड आयुष्य लाभो, याच माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा!
तुळशीदास बबन शिंदे – 9552530271 / 9822491684
 

ताज्या बातम्या