दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात दिग्गजांची मांदियाळी
शबनम न्युज : – दि.२८ पिंपरी साहित्य, संस्कृती, शिक्षण, राजकीय, उद्योग क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांसह पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांच्या उपस्थितीत रविवारी गप्पांची मैफल रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित दिवाळी फराळ उपक्रमाचे.
पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन (बासरी सभागृह) येथे रविवारी (दि. 27) आयोजित केलेल्या दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रामचंद्र देखणे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, महापौर राहुल जाधव, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शत्रृघ्न काटे, सुरेश भोईर, संतोष कांबळे, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, संजय काटे, तसेच ओमप्रकाश पेठे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, पोलिस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, उद्योजक बाळासाहेब कदम, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनीच दिवाळी फराळाचा आनंद घेत दिलखुलास संवाद साधला. दोन तास गप्पांची मैफल रंगली. उखाळ्या – पाखाळ्या निघाल्या. त्यातून अनेकदा हास्याचे कारंजे फुलले. डॉ. कोत्तापल्ले आणि डॉ. देखणे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ.कोत्तापल्ले म्हणाले की, विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र यावे म्हणून दिशा सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेला दिवाळी फराळ हा उपक्रम म्हणजे आनंदाची पर्वणी आहे. अशा उपक्रमातून पिंपरी चिंचवडचा आणखी विकास व्हावा व शहराला साजेसा सांस्कृतीक चेहरा निर्माण व्हावा व शहराला साजेसा सांस्कृतीक चेहरा निर्माण व्हावा.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, भेद हा अंधार आहे तर अभेद हा मोठा उजेड आहे. अभेदातून उजेड निर्माण करावा, या भावनेतून आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळी अनुभूती आहे. राजकारणातील मतभेद दूर ठेवून एका व्यासपीठावर सर्व पक्षीय नेत्यांनी, साहित्यकांनी एकत्र येवून केलेला हा कार्यक्रम शहरातील एकमेव उदाहरण आहे.
ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने ऋण व्यक्त केले. सुत्रसंचालन नाना शिवले आणि आभार सचिन साठे यांनी मानले.