Wed. May 27th, 2020

दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक युवती जागीच ठार

SHABNAM NEWS : GOA (DATE. 19) – खोर्ली जुने गोवे येथे गुरुवारी दुपारी दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेली प्रिया गावडे (वय 20, रा. नावेली, साखळी)ही युवती जागीच ठार झाली. दुचाकी चालक अजय नाईक (रा. डिचोली) व दुचाकीवरील अन्य सहप्रवासी तेजा गावडे (साखळी) दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक गुंडप्पा हरमती (वय 56, हावेरी, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुने गोवे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघात गुरुवारी दुपारी 1.15 वाजता घडला. दुचाकी चालक अजय नाईक हा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर (जीए 04 के 979) 9 ने सहप्रवासी प्रिया व तेजा यांना सोबत घेऊन खोर्लीच्या दिशेने येत होता. खोर्ली येथे पोहोचताच त्या दिशेने येणार्‍या (जीए 07 एफ 5037) या ट्रकची धडक दुचाकीला बसली.

सदर धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. तर प्रिया ही ट्रकच्या चाकाखाली आली, असे पोलिस निरीक्षक दळवी यांनी सांगितले. या अपघातात प्रिया ही जागीच ठार झाली. तर अजय व तेजा हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच या रस्त्यावरून जाणार्‍या वाहन चालकांनी त्वरित जुने गोवे पोलिस तसेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला. व जखमींना गोमेकॉत दाखल केले.

 

 

ताज्या बातम्या